HomeBlogबडूरमध्ये तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १९,७२० चा...

बडूरमध्ये तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १९,७२० चा मुद्देमाल जप्त…. नायगाव ता. गोविंद नरसीकर

बडूरमध्ये तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १९,७२० चा मुद्देमाल जप्त

=================
नायगाव प्रतिनिधी — गोविंद नरसीकर
बिलोली तालुक्यातील बडूर येथील बसस्थानकाजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर बिलोली पोलिसांनी दि. २ आॅगसट रोजी रविवारी सायंकाळी धाड टाकत पाच जणांना रंगेहात पकडले, तर अड्डा चालविणारा एक संशयित पोलिसांना चकवा देत पसार झाला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १९ हजार ७२० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सपोनि विजय जाधव यांनी दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगांवकर व पोलीस निरीक्षक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. बडूर येथील बसस्थानकाशेजारी, बिलोली–मिनकी मार्गालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण पैशांवर ‘तिर्रट’ हा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांची लेखी परवानगी घेऊन पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचला.

सायंकाळी सुमारे ४ वाजता टाकलेल्या छाप्यात सहा जण गोलाकार बसून जुगार खेळताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच मोहनराव व्यंकटराव जाधव हा संशयित घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, उत्तम सटवाजी दावलेकर, मच्छिंद्रनाथ मरीबा दावलेकर, दिपक ज्ञानोबा तगेवार, मंगेश राम हासनवार आणि बालाजी ईग्रामगोड मुलगीलवार या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. असल्याचे सपोनि विजय जाधव यांनी सांगितले.

झडतीदरम्यान आरोपींकडून १,२२० रोख रक्कम, तीन मोबाईल फोन (किंमत १८,५००) तसेच तिर्रट जुगारासाठी वापरले जाणारे ३७ पत्ते जप्त करण्यात आले. पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस अंमलदार गंगाधर सायना शुंपटवाड यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये सहा आरोपींविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार झालेल्या संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत.

अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले असून, अशा बेकायदेशीर प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सपोनि विजय जाधव यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular