
नांदेड लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीबाबत खासदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र…
नायगाव,, तानाजी शेळगावकर,
नांदेड लोकसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गेल्या १५ ते २० दिवसांपासून अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची गंभीर दखल घेत नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. खा. प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण _यांनी जिल्हाधिकारी, नांदेड यांना पत्र देऊन शेतकरी व पशुपालकांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली आहे.
पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला असून अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतांमध्ये सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मूग, हळद यासह विविध खरीप पिके उभी आहेत. मात्र पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटत असून पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहू शकते.
उभ्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी उपलब्ध जलस्रोतांमधून कृषी पंपांच्या साहाय्याने सिंचन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे कृषी पंप सुरळीतपणे चालविता येत नसल्याने पिकांना वेळेत पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे महावितरण विभागाशी समन्वय साधून कृषी पंपांसाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी खासदारांनी केली आहे.
सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठ्याचा आढावा घेण्याची मागणी
पावसाअभावी ग्रामीण भागातील विहिरी, तलाव व इतर जलस्रोतांमधील पाणीसाठाही कमी होत आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर उर्ध्व मानार प्रकल्प, बारूळ, पेनगंगा, इसापूर तसेच इतर सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घेऊन नियमानुसार कालव्याद्वारे आवश्यक पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा घेण्याचे निर्देश द्यावेत
जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शेतकऱ्यांची उभी पिके वाचविणे, पशुधनासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि शेतकरी व पशुपालकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक व प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले..




