
नायगाव प्रतिनिधी- गोविंद नरसीकर
पारंपरिक शाहिरी लोककलेची समृद्ध परंपरा जपण्यासह नव्या पिढीला लोककलेची ओळख व्हावी, या उद्देशाने पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ, बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र व जोशाबा उद्योग विकास मिशन संस्था, नरंगल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोककलावंतांचा जागर व मान्यवरांचा गौरव सोहळा २०२६-२७’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे हे पहिले वर्ष असून, आज दि. ३१ ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत गगनबीड महादेव मंदिर परिसरात हा सोहळा रंगणार आहे.
शाहिरी, भजन, पोवाडा आणि पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या लोकपरंपरेतील कलावंतांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा आणि धार्मिक-सामाजिक संस्कृतीचा वारसा पुढे न्यावा, या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गगनबीड महादेव मंदिराच्या पावन परिसरात होणाऱ्या या सोहळ्यामुळे धार्मिक वातावरणासोबतच पारंपरिक लोककलेचा जागर अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक तथा जोशाबा उद्योग विकास मिशन संस्था, नरंगलचे संस्थापक अध्यक्ष शाहीर साहेबराव नरंगलकर असून, संयोजक म्हणून सामाजिक कार्यकर्ते बालाजी सूर्यवंशी काम पाहत आहेत. स्वागताध्यक्षपदी शाहीर बापुराव मोहनराव जमदाडे यांची निवड करण्यात आली आहे. ते बहुजन टायगर युवा फोर्स व पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा अध्यक्ष आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन टायगर युवा फोर्स व पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे राहणार आहेत.
या सोहळ्यात विविध शाहीर, लोककलावंत आणि भजनी मंडळांचा सहभाग राहणार असून, त्यांच्या कलेचा गौरव करण्यात येणार आहे. लोककलेचे संवर्धन, कलावंतांचा सन्मान आणि समाजप्रबोधनाचा संदेश या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम नायगाव परिसरातील सांस्कृतिक चळवळीला नवे बळ देणारा ठरणार आहे.
लोककला ही केवळ मनोरंजनाची साधना नसून समाजाच्या संस्कृती, इतिहास आणि प्रबोधनाचा जिवंत वारसा आहे. या वारशाच्या जतनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




