HomeBlogसकल मातंग समाजाच्या महामोर्चाने राज्यामध्ये सरकारचे वेधलं लक्ष..नायगाव, अशोक वाघमारे

सकल मातंग समाजाच्या महामोर्चाने राज्यामध्ये सरकारचे वेधलं लक्ष..नायगाव, अशोक वाघमारे

महामोर्चातील लाखो जनसमुदायाच्या एकजुटीने नांदेडमध्ये रचला इतिहास!

नायगाव प्रतिनिधी

सकल मातंग समाजाच्या हक्कासाठी आणि आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी आज नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश महामोर्चात सकल मातंग समाज बांधवांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत विक्रमी उपस्थिती नोंदविली. समाजाच्या इतिहासात हा महामोर्चा एक नवा अध्याय ठरला असून, उपस्थिती आणि एकजुटीच्या दृष्टीने या मोर्चाने विक्रमी प्रतिसाद मिळविला आहे.

या महामोर्चात नांदेड जिल्ह्यासह विविध भागांतील सकल मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेष म्हणजे इतर समाजातील बांधवांनीही या महामोर्चाला उत्स्फूर्त सहकार्य करत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. समाजाच्या हक्काच्या या लढ्याला मिळालेला सर्वसमावेशक पाठिंबा हीच या महामोर्चाची मोठी ताकद ठरली आहे. या सर्व समाज बांधवांचे सकल मातंग समाजाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

समाजाच्या हक्कासाठीचा हा लढा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, अधिक एकजुटीने आणि ताकदीने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आजचा महामोर्चा हा आपल्या मोठ्या लढाईचा ‘सेमीफायनल’ होता आणि समाजाच्या अभूतपूर्व एकजुटीमुळे आपण हा सेमीफायनल जिंकलो असल्याची भावना समाज बांधवांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाच्या आंदोलनाच्या इतिहासात नांदेडचा हा महामोर्चा पहिला आणि ऐतिहासिक महामोर्चा म्हणून ठरला आहे. त्यामुळे या यशात योगदान देणाऱ्या प्रत्येक सकल मातंग समाज बांधवाचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

आता सर्वांचे लक्ष आगामी मुंबई येथील महामोर्चाकडे लागले असून, नांदेडच्या महामोर्चापेक्षाही अनेक पटीने मोठ्या संख्येने समाज बांधव मुंबईच्या आंदोलनात सहभागी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

“आजची एकजूट हीच आपल्या हक्काच्या लढ्याची सर्वात मोठी ताकद आहे. अशाच पद्धतीने एकदिलाने, एकजुटीने आणि संघटित राहून आपल्या हक्कांसाठीचा लढा अधिक तीव्र करूया. नांदेडच्या महामोर्चाने दाखविलेली ही ताकद आता मुंबईतही अनेक पटीने दिसून येईल,” असा निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular