HomeBlogमतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे- उपजिल्हाधिकारी राजकुमार माने..... नांदेड प्रतिनिधी अशोक...

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे- उपजिल्हाधिकारी राजकुमार माने….. नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

मतदार यादी पुनरीक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे- उपजिल्हाधिकारी राजकुमार माने

नायगाव तालुक्यात बीएलओमार्फत घरभेटी सुरू

नांदेड,
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (SIR)–२०२६ मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने यांनी केले. मतदार यादीतील अचूकता ही लोकशाही व्यवस्थेचा भक्कम पाया असून, कोणताही पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवार (दि. ४ जुलै) रोजी नायगाव तालुक्यातील कुंटूर, बरबडा आणि नरसी येथे भेट देत त्यांनी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ), मतदार तसेच नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड आणि निवडणूक विभागाचे सुपरवायझर के. एल. नलबलवार उपस्थित होते. मोहिमेची उद्दिष्टे, प्रक्रियेचे स्वरूप आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या जनजागृती उपक्रमाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.
या विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ घरभेटी देऊन प्रगणन फॉर्मचे वितरण, माहिती संकलन आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत. प्रत्येक घराला तीन वेळा भेट देण्यात येणार असल्याने नागरिकांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नाव समाविष्ट करणे, वगळणे अथवा दुरुस्तीसाठी दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त अर्जांवर सुनावणी घेऊन ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निर्णय केला जाईल आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यावेळी राजकुमार माने यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत अचूक असल्याची खात्री करून आवश्यक दुरुस्ती वेळेत करून घेण्याचे आवाहन केले. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतील सर्वात मूलभूत अधिकार असल्याने कोणताही पात्र मतदार यादीबाहेर राहणार नाही, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन ही माहिती आपल्या परिसरातही पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास बीएलओ जिलानी बागवान, चिंतले, कवटीकवार, चिखले, आडबलवार, गाजलवाड व नंदकिशोर नरसीकर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular