HomeBlogपोलीस ठाण्याच्या सावलीतच चोर मोकाट…..नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

पोलीस ठाण्याच्या सावलीतच चोर मोकाट…..नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे

पोलीस ठाण्याच्या सावलीतच चोर मोकाट…..

नायगावात एका रात्रीत पाच दुकाने फोडली; पोलीस गस्त होती तरी कुठे?

व्यापाऱ्यांचा संताप अनावर; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

नांदेड प्रतिनिधी,

नायगाव शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य बाजारपेठेतील तब्बल पाच दुकाने शनिवार-रविवारच्या मध्यरात्री फोडण्यात आली. या धाडसी चोरीनंतर व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली असून, पोलीस ठाण्याजवळच दुकाने सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेला लक्ष्य केले. एकामागोमाग एक दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. रोकड, मौल्यवान साहित्य तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंवर हात साफ करण्यात आला. पहाटे दुकानदार दुकाने उघडण्यासाठी आले असता तुटलेली शटर, अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आणि चोरी झाल्याचे दृश्य पाहून एकच खळबळ उडाली.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोरी झालेला परिसर पोलीस ठाण्याच्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे चोरट्यांनी थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. एका रात्रीत सलग पाच दुकाने फोडली जात असताना रात्रीची पोलीस गस्त नेमकी कुठे होती? गस्तीची जबाबदारी पार पडली का? अशा प्रश्नांची सरबत्ती व्यापारी वर्गातून होत आहे.
नायगाव शहरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना वाढत असताना त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे. भरवस्तीतील आणि मध्यवर्ती बाजारपेठेतील ही घटना नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण करणारी ठरली आहे. व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, चोरी झाल्यानंतर तपासाची औपचारिकता करण्यापेक्षा अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
व्यापारी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत चोरट्यांना तातडीने अटक करावी, रात्रीची गस्त वाढवावी, बाजारपेठेत कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही व्यापाऱ्यांनी दिला आहे.

======चौकट =======
व्यापाऱ्यांचा संताप; पोलीस ठाण्यालगतच चोरी, मग सुरक्षित कोण?

पोलीस ठाण्याच्या जवळच एक-दोन नव्हे तर थेट पाच दुकाने फोडली जातात, ही नायगावच्या सुरक्षाव्यवस्थेची गंभीर शोकांतिका आहे. चोरट्यांना जर पोलीस ठाण्याचाही धाक उरला नसेल, तर सामान्य व्यापारी आणि नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची?” असा संतप्त सवाल व्यापारी वर्गाने उपस्थित केला आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular