
ब्लू बेल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे लोकार्पण; ‘नायगावकरांच्या विश्वासास के. हरिबाबू सर पात्र’ – खासदार रवींद्र चव्हाण
नांदेड , प्रतिनिधी
नायगाव शहरातील शिक्षण क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ब्लू बेल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या भव्य इमारतीचे लोकार्पण रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करत, “नायगावकरांनी दाखविलेल्या विश्वासास संस्थेचे संचालक के. हरिबाबू सर पूर्णपणे पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात संस्थेचे योगदान मोलाचे आहे,” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणदेवता सरस्वती माता तसेच स्वर्गीय आमदार बळवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र पाटील चव्हाण होते. यावेळी राजेश देशमुख कुंटूरकर, हनुमंतराव पाटील चव्हाण, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, मोहनराव पाटील धुपेकर, सय्यद रहीम शेख, विजय पाटील चव्हाण, सुरेश पाटील कल्याण, संजय पाटील चव्हाण, पंकज पाटील चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
१९९५ मध्ये अवघ्या ४८ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांपासून सुरू झालेल्या या संस्थेने आज तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची व्याप्ती वाढविली आहे. स्वर्गीय आमदार बळवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून संस्थेची पायाभरणी झाली. संचालक के. हरिबाबू सर आणि संचालिका लक्ष्मीताई यांनी अथक परिश्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोनाच्या बळावर संस्थेला नावलौकिक मिळवून दिला.
खासदार चव्हाण म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेने केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक तसेच विविध शासकीय पदांवर पोहोचले असून, हीच संस्थेच्या यशाची खरी पावती आहे.
यावेळी बालाजी बच्चेवार यांनी के. हरिबाबू सर यांच्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पित वृत्तीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच संस्थेने वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. संचालिका लक्ष्मीताई यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने भर पडल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजेश देशमुख कुंटूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणासोबत क्रीडा शिक्षणालाही तितकेच महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली. भविष्यात विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सक्षम घडविण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा, संस्कार आणि कौशल्य विकासावर भर देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
प्रास्ताविकात संचालक के. हरिबाबू यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा संघर्षमय प्रवास उलगडला. नायगावकरांनी दाखविलेल्या विश्वास, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि स्वर्गीय बळवंतराव चव्हाण व स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळेच ही संस्था उभी राहिल्याचे त्यांनी सांगितले. नव्या इमारतीच्या उभारणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शहर व परिसरातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





