HomeBlogपोलीस अधिकारी विजय जाधव यांचे विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांवर सखोल मार्गदर्शन...... नायगाव, गोविंद...

पोलीस अधिकारी विजय जाधव यांचे विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांवर सखोल मार्गदर्शन…… नायगाव, गोविंद नरसीकर

दबंग पोलीस अधिकारी विजय जाधव यांचे विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांवर सखोल मार्गदर्शन

फेसबुक, इन्स्टाग्राम, डिजिटल अरेस्ट, एटीएम फसवणूक ते NCCRP पोर्टलपर्यंत विविध विषयांवर जागरूकतेचा संदेश

नायगाव प्रतिनिधी — गोविंद नरसीकर

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बिलोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बिलोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, त्यापासून बचावाचे उपाय आणि कायदेशीर मदतीची साधने याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या प्रभावी आणि उदाहरणांसह केलेल्या मार्गदर्शनातून विजय जाधव यांनी सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी, फेसबुक व इन्स्टाग्रामवरील बनावट प्रोफाइल, एटीएम व ऑनलाइन बँकिंग फसवणूक, फोनपे व इतर डिजिटल व्यवहारांतील धोके, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुका, अज्ञात APK फाइल डाउनलोड करण्याचे दुष्परिणाम, मोबाईल व्यसनाधीनता तसेच महिला सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे, आपत्कालीन परिस्थितीत 112 या क्रमांकाचा वापर करण्याचे तसेच NCCRP पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. डिजिटल युगात सतर्कता, संयम आणि माहितीची पडताळणी हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची प्रभावी गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती एंबडवार, शेख सर, शिक्षक-शिक्षिका तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या स्वाती एंबडवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी दिलेल्या उपयुक्त आणि जनजागृतीपर मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनातून सायबर सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याची भावना व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular