
नायगाव प्रतिनिधी – गोविंद नरसीकर
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज दि.२८ रोजी शुक्रवारी नायगाव तालुक्यातील मौजे कुंचेली येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
जयंती सोहळ्याच्या निमित्ताने गावातील मातंग समाज बांधवांनी स्मशानभूमी, समाजमंदिर आणि अंतर्गत रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रा. मनोहर तोटरे यांचे लक्ष वेधले. गावातील मूलभूत सुविधांचा अभाव दूर करून विकासकामांना गती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत प्रा. मनोहर तोटरे यांनी कुंचेलीच्या विकासकामांसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. गावातील प्रश्नांबाबत आमदार राजेश पवार तसेच पूनम ताई पवार यांच्याशी लवकरच चर्चा करून आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी ग्वाही तोटरे यांनी दिली असल्याने आमदार राजेश पवार व पुनमताई पवार यांचे अतिशय विश्वासू म्हणून नायगाव तालुक्यात ओळख असलेले तोटरे सर यांनी दिलेल्या शब्दाला आमदार नक्कीच हो भरतील व कुंचेली गावातील कामे होतील अशी अपेक्षा गावकऱ्यांच्या वतीने व्यक्त होत आहेत.
गावच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन मिळाल्याने मातंग समाज बांधवांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी प्रा. तोटरे यांचे आभार मानले.
कार्यक्रमास सरपंच मनोहर तोटरे, ज्येष्ठ पत्रकार गोविंद नरसीकर, कैलास तेलंग, माधवराव पाटील घाटोळे, सरपंच गोविंद पाटील डाकोरे, पंडित पाटील बसवदे, गुणवंत पाटील डाकोरे, सुदाम पाटील होणराव, भुजंग पाटील होणराव, बालासाहेब येरवडे, माजी सरपंच बालाजी जाधव, बाबू सय्यद, हनमंत पाटील यांच्यासह जयंती मंडळाचे पदाधिकारी गुंडाजी बोयाळ, बाबू बोयाळ, साहेबराव बोयाळ, दत्ता बोयाळ, उद्धव बोयाळ, लक्ष्मण बोयाळ, अशोक बोयाळ आदी उपस्थित होते. महिला, युवक व ग्रामस्थांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




