
महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत प्रसाद साळुंके तालुक्यात पाचवा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये दुगाव, ता. बिलोली येथील विद्यार्थी प्रसाद भाऊसाहेब साळुंके याने इयत्ता चौथीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत भोकर तालुक्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल दुगाव सह भोकर तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
प्रसाद साळुंके हा दुगाव येथील रहिवासी असून, तो मारोतराव पाटील साळुंके यांचा नातू आहे. त्याचे वडील भाऊसाहेब मारोतराव पाटील साळुंके हे रेल्वे विभागात नोकरीस आहेत. शिक्षणाला प्राधान्य देत सातत्याने अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर प्रसादने हे यश मिळविले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षे सारख्या स्पर्धात्मक परीक्षेत तालुकास्तरावर पाचवा क्रमांक मिळविणे ही त्याच्या अभ्यासातील सातत्याची आणि गुणवत्तेची पावती मानली जात आहे. लहान वयातच स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून मिळविलेल्या या यशामुळे प्रसादने आपल्या कुटुंबासह दुगाव गावाचेही नाव उज्ज्वल केले आहे.
प्रसादच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गावातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही त्याने शैक्षणिक क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.




