HomeBlogराहेर ते नरसी भव्य कावड यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन...

राहेर ते नरसी भव्य कावड यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साईनाथ अक्कमवाड …. नायगाव, गोविंद टोकलवाड

‘हर हर महादेव’च्या जयघोषात गंगाजलाने होणार श्री सिद्धेश्वर महादेवाचा अभिषेक

नायगाव प्रतिनिधी : गोविंद टोकलवाड

श्रावणातील भक्तिमय वातावरणात ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने नरसी परिसर दुमदुमणार आहे. नरसी येथील वे. शा. सं. पंडित श्री संदीप महाराज जोशी व श्री सिद्धेश्वर मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र राहेर ते नरसी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता नरसी येथील काशी विश्वेश्वर स्वरूप श्री सिद्धेश्वर मंदिरातून यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

यात्रेतील शिवभक्त पहाटे राहेर येथील श्रीक्षेत्रात पोहोचल्यानंतर सकाळी ६ वाजता पवित्र गोदावरी नदीपात्रातून जलकुंभात गंगाजल घेणार आहेत. त्यानंतर कावडी खांद्यावर घेत राहेर–दुगाव–गागलेगाव–लोहगाव मार्गे नरसी असा पायी प्रवास करीत शिवनामाचा गजर करत श्री सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्थान करणार आहेत.

कावड यात्रेच्या मार्गावर भाविकांसाठी ठिकठिकाणी फराळ व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावणातील पवित्र वातावरणात भगवंताचे नामस्मरण करीत, ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत शिवभक्तांचा हा पायी प्रवास होणार आहे. नरसी येथे श्री सिद्धेश्वर मंदिरात कावड यात्रा पोहोचल्यानंतर भाविकांकडून गोदावरीचे पवित्र गंगाजल श्री सिद्धेश्वर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून विधिवत अभिषेक करण्यात येणार आहे.

गोदावरीच्या पवित्र जलाने महादेवाचा अभिषेक आणि त्यानंतर महाप्रसादाचा सोहळा असा धार्मिक कार्यक्रम यावेळी होणार आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शिवभक्तांमध्ये कावड यात्रेबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या चरणी जल अर्पण करण्याची परंपरा भक्तिभावाने जोपासली जाते. या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेत पंचक्रोशीतील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन साईनाथ अक्कमवाड व श्रीनिवास अक्कमवाड यांनी केले आहे.

कावड यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी वे. शा. सं. पंडित संदीप महाराज जोशी, साईनाथ अक्कमवाड, श्रीनिवास अक्कमवाड, पत्रकार कैलास तेलंग टेंभुर्णीकर, अनिल सावकार श्रीरामवार यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत. नोंदणी केलेल्या भाविकांसाठी नरसी येथून राहेरपर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

श्रावणातील या पवित्र कावड यात्रेच्या निमित्ताने शिवभक्तीचा जागर होणार असून, गोदावरीच्या पवित्र जलाने श्री सिद्धेश्वर महादेवाचा अभिषेक करून धार्मिक वातावरणात हा सोहळा संपन्न होणार आहे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular