
लव्हराळ जि.प.शाळेत स्तुत्य उपक्रम शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप…
माझी शिक्षकांनी जपला विद्यार्थ्यांचा जिव्हाळा…
नायगाव प्रतिनिधी– गोविंद टोकलवाड
लोहा तालुक्यातील लव्हराळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी शिक्षक विक्रम गबाळे यांनी आपल्या माजी शाळेबद्दलची आत्मीयता जपत रविवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी शाळेला भेट देत सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन तसेच खाऊचे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक व विद्यार्थीहिताच्या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
शिक्षक हा केवळ अध्यापन करणारा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सतत झटणारा मार्गदर्शक असतो, याची प्रचिती विक्रम गबाळे यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा करून दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य देत त्यांनी शिक्षणाविषयीची प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल बादवड यांच्या हस्ते विक्रम गबाळे यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात सरपंचांनी गबाळे सरांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत, शाळा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी जपत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अशा सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तींच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल, असे गौरवोद्गार काढले.
शाळेच्या वतीने तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विक्रम गबाळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही आनंदाने शैक्षणिक साहित्य स्वीकारत गबाळे सरांना शुभेच्छा व धन्यवाद दिले.
यावेळी सरपंच विठ्ठल बादवड, ज्ञानेश्वर पंदनवड, गंगाधर साबळे, राजु साबळे, शिक्षक देवपुंजे, पंडीत पुठेवाड सह शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, महीला, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







