HomeBlogचिमुकल्या हातांनी धरला हरित भविष्यासाठी ‘सीडबॉल’चा धागा... नायगाव, गोविंद नरसीकर

चिमुकल्या हातांनी धरला हरित भविष्यासाठी ‘सीडबॉल’चा धागा… नायगाव, गोविंद नरसीकर

चिमुकल्या हातांनी धरला हरित भविष्यासाठी ‘सीडबॉल’चा धागा

पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम; ओसाड जमिनीवर फेकले वृक्षबियांचे सीडबॉल

नायगाव बाजार — गोविंद नरसीकर
वृक्षारोपण केवळ रोपे लावण्यापुरते मर्यादित न ठेवता, निसर्गाच्या सहकार्याने नव्या वृक्षांची निर्मिती करण्याचा अभिनव उपक्रम हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे राबविण्यात आला. ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध वृक्षांच्या बियांचा वापर करून तयार केलेले ‘सीडबॉल’ माळरानावर तसेच ओसाड जमिनीवर टाकत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला.

वर्गशिक्षिका सौ. सुनीता मोखंडपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध वृक्षांच्या बिया मातीमध्ये मिसळून सीडबॉल तयार केले. आपल्या छोट्या हातांनी तयार केलेले हे सीडबॉल विद्यार्थ्यांनी परिसरातील माळरान व ओसाड जमिनीवर टाकले. पावसाळ्यात या बियांना नैसर्गिकरीत्या अंकुर फुटून त्यापासून नवीन रोपे तयार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरातील हिरवाई वाढण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे केवळ पुस्तकातून न देता प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आले. ‘आजची बीजं, उद्याची झाडं’ या भावनेतून चिमुकल्यांनी निसर्गाशी आपले नाते अधिक घट्ट केले. सीडबॉलच्या माध्यमातून वृक्षनिर्मितीची संकल्पना विद्यार्थ्यांना समजली आणि पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांच्या मनावर बालवयातच रुजली.

माळरानावर पडलेली ही छोटी-छोटी बीजगोळे आज नगण्य वाटत असली, तरी योग्य पाऊस, माती आणि निसर्गाची साथ मिळाल्यास त्यातून उद्याची हिरवाई उभी राहू शकते. वृक्षारोपणाच्या पारंपरिक संकल्पनेला कृतीशील पर्याय देणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे.

बालवयातच पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण झाली, तर भविष्यात निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी अधिक जबाबदार होईल. त्यामुळे पिंपळगावच्या शाळेतील वर्ग शिक्षिका सुनिता मोखंडपले यांचे पालक वर्गातून या कार्याचे कौतुक होत आहे. या उपक्रमातून ‘चिमुकले हात, मोठी जबाबदारी’ असा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular