HomeBlogआमदारांचा निधी भरघोस; मात्र विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!.... नायगाव, गोविंद नरसीकर

आमदारांचा निधी भरघोस; मात्र विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!…. नायगाव, गोविंद नरसीकर

आमदारांचा निधी भरघोस; मात्र विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!

मरवाळीतील नाथोबा मंदिर जोडरस्त्याच्या कामाबाबत नागरिकांमध्ये नाराजी; कामांची चौकशी करण्याची मागणी

नरसी प्रतिनिधी — गोविंद नरसीकर
नायगाव विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून वाडी-वस्ती, तांडे तसेच गावागावांत रस्ते, नाल्या, समाजमंदिरे, संरक्षण भिंती आदी कामांचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागत असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे या विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण योजनेंतर्गत (३०५४-३११२) नाथोबा मंदिर जोडरस्त्याची सुधारणा करण्यासाठी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ग्रा.मा.-४५ वरील कि.मी. ००/०० ते ०१/०० या अंतरातील या रस्त्याचे लोकार्पण आमदार राजेश पवार यांच्या हस्ते, भाजपा जिल्हा सरचिटणीस सौ. पुनमताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

आमदार पवार यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासकामांना गती दिल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. त्यामुळे विरोधकांनाही टीकेसाठी फारशी संधी मिळत नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र निधी आणणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्या निधीतून होणाऱ्या कामांचा दर्जा राखणेही महत्त्वाचे आहे, अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मरवाळी येथील रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांकडून कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली जात असून, करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही कामे थातूरमातूर होत असतील तर विकासाचा नेमका फायदा कोणाला?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित कंत्राटदारांकडून दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अभियंत्यांची असताना प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेवर पुरेसे नियंत्रण आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काही ठिकाणी कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेतील अधिकारी-अभियंत्यांच्या संगनमतामुळे कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, त्याची सक्षम यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

आमदार राजेश पवार यांनी मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असताना, काही निकृष्ट कामांमुळे त्यांच्या विकासाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे नायगाव मतदारसंघात पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या प्रमुख विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची तपासणी करावी, संबंधित कंत्राटदारांकडून त्रुटी आढळल्यास कामे दुरुस्त करून घ्यावीत आणि दोषी अधिकारी-कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

‘निधी आमदारांचा, पण दर्जाची जबाबदारी प्रशासनाची’ या भूमिकेतून या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, कोट्यवधींच्या विकासनिधीचा खरा लाभ जनतेला मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular