HomeBlogवसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गोविंद शिनगारे यांचा गौरव...... नायगाव प्र. गोविंद...

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गोविंद शिनगारे यांचा गौरव…… नायगाव प्र. गोविंद नरसीकर

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गोविंद शिनगारे यांचा गौरव

बिजूरच्या प्रगतशील शेतकऱ्याचा राज्यस्तरीय सन्मान; आधुनिक शेतीतील योगदानाची दखल

नायगाव प्रतिनिधी– गोविंद नरसीकर
येथून जवळच असलेल्या बिजूर तालुका बिलोली येथील प्रगतशील शेतकरी गोविंद बाबाराव शिनगारे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे सन २०२३ चा प्रतिष्ठेचा “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” प्रदान करण्यात आला. राज्यातील शेती क्षेत्रात नवकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादनवाढ, शाश्वत शेती आणि इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी कार्य याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला.
मुंबई येथील वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शिनगारे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर, अधिकारी आणि राज्यभरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोविंद शिनगारे यांनी आपल्या मेहनत, सातत्य आणि प्रयोगशील वृत्तीच्या जोरावर शेतीला आधुनिकतेची जोड देत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पारंपरिक शेतीबरोबरच सुधारित तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि शेतकरीहिताच्या उपक्रमांमुळे त्यांनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा दिली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव राज्य शासनाने पुरस्काराच्या माध्यमातून केल्याने बिजूर गावासह संपूर्ण बिलोली तालुका आणि नांदेड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती सरोजा शिनगारे, कन्या अनुजा शिनगारे, सुपुत्र अजय शिनगारे, तसेच शिवाजीराव कु-हाडे यांच्यासह कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. बिजूर ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, कृषी क्षेत्रातील जाणकार, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी बांधवांकडून गोविंद शिनगारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.
ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरीही जिद्द, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळवू शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण गोविंद शिनगारे यांनी आपल्या कार्यातून निर्माण केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील तरुण शेतकऱ्यांमध्ये नव्या उमेदीने आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular