HomeBlogलव्हराळच्या जिल्हा परिषद शाळेत पाण्याविना विद्यार्थी; शौचालयही नाही.... लोहा प्रतिनिधी

लव्हराळच्या जिल्हा परिषद शाळेत पाण्याविना विद्यार्थी; शौचालयही नाही…. लोहा प्रतिनिधी

दोन दिवसांत सुविधा न झाल्यास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांचा उपोषणाचा इशारा; मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी

लोहा प्रतिनिधी- ज्ञानेश्वर पंदनवाड

लोहा तालुक्यातील लव्हराळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासूनच वंचित राहावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून शौचालयाची सुविधाही उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती कायम असून, संबंधित प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी मिळावे तसेच शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे अनेक वेळा तोंडी तसेच लेखी स्वरूपात तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

‘दोन दिवसांत व्यवस्था करा, अन्यथा उपोषण’

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या दोन दिवसांत शाळेत पिण्याच्या पाण्याची व विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची व्यवस्था पूर्ण न झाल्यास शाळेच्या प्रांगणात उपोषण करण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पंदनवाड यांनी दिला आहे.

शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान पिण्याचे पाणी आणि शौचालयासारख्या मूलभूत सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही प्रश्न प्रलंबित राहिल्याने पालकांमध्येही तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जबाबदारी निश्चित करावी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात. विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवून शाळेत तातडीने पिण्याचे पाणी व शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. सुविधा उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ करणाऱ्या संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कार्यवाही करावी, अशीही मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular