
पंचमीच्या शुभमुहूर्तावर यमुनाबाई भाऊराव माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमध्ये रंगला ‘भुलया’चा पारंपरीक खेळ..
नांदेड,
नायगाव, दि.17 ऑगस्ट : श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ,होटाळा अंतर्गत येणाऱ्या यमुनाबाई भाऊराव माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज,नायगावच्या प्रांगणात पंचमीच्या शुभमुहूर्तावर विद्यार्थ्यांनी पारंपरिक ‘भुलया’ खेळ सादर करत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे जतन करण्याचा अनोखा संदेश दिला.
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विविध सण-उत्सवांना विशेष महत्त्व असून,पंचमीचा दिवस महिलांसाठी आणि विशेषतः पारंपरिक लोकपरंपरांसाठी महत्त्वाचा मानला जातो.पूर्वी महिला गाणी,ओव्या आणि पारंपरिक तालाच्या साथीने ‘भुलया’ हा खेळ खेळत असत.मात्र,आधुनिकतेच्या प्रवाहात ही समृद्ध परंपरा हळूहळू लोप पावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या पारंपरिक संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी आणि तिचे संवर्धन व्हावे,या उद्देशाने संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ,होटाळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.शिवराज पाटील होटाळकर साहेब यांनी संस्थेतील सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना विविध धर्म,समाज आणि महाराष्ट्रातील रूढी-परंपरांची माहिती करून देण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थीदशेतच आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची ओळख झाल्यास त्यांच्यामध्ये संस्कार व सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होते,या विचारातून हा उपक्रम घेण्यात आला.
संस्थेचे प्रशासकीय प्रमुख के.व्ही.फाजगे सर,मिलेनियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.वडजे सर,उपप्राचार्य जोशी सर, श्रीदत्त ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.सूर्यवंशी सर, श्रीदत्त माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एकनाथ कल्याण सर,मुख्याध्यापक श्री.रुपेश पवार सर, मुख्याध्यापिका सौ पांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी उत्साहात ‘भुलया’ खेळ सादर केला.
पारंपरिक गाणी आणि ओव्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी ‘भुलया’ खेळत उपस्थितांची मने जिंकली.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनाची संधी मिळाली नाही,तर आपल्या मातीत रुजलेल्या लोकपरंपरांचा परिचयही झाला.
यावेळी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजावेत, आपल्या संस्कृतीची जपणूक व्हावी आणि लोप पावत चाललेल्या पारंपरिक लोककला व रूढी-परंपरांचे संवर्धन व्हावे,या उद्देशाने श्रीदत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संस्थांच्या प्रांगणात विविध पारंपरिक सण व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात साजरे करण्यात आले.




