
सालेगाव, डोंगरगाव, धनंज, हुस्सा व राहेर परिसरात विनपरवाना देशी दारूचे पार्सल जोमात…
दारू पार्सल करणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची जनतेची मागणी.
नांदेड / प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील सालेगाव, डोंगरगाव, हुस्सा, राहेर, तसेच दुगाव या गावांमध्ये मोटारसायकलवरून अवैधरित्या देशी दारूचे पार्सल टाकले जात असल्याची बाब समोर आली असून या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नरसी येथून एक युवकाकडून ही पार्सल सेवा सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असून संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संबंधित युवक मोटारसायकलच्या माध्यमातून विविध गावांमध्ये देशी दारूचे पार्सल पोहोचवत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी मागणीनुसार दारू घरपोच दिली जात असल्याची चर्चा असून यामुळे ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचे जाळे अधिक मजबूत होत झाल्याचे दिसत आहेत.परिणामी गावातच दारू मिळत असल्यामुळे नवतरुण पिढी व्यसनाधीन होतं चालली आहेत.
विशेष म्हणजे, संबंधित व्यक्ती कोणत्याही भीतीशिवाय खुलेआमपणे हा व्यवसाय सुरु असून याला अभय कोणाचे असाही सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्यास अशा प्रकारच्या अवैध पुरवठ्यामुळे खतपाणी मिळत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
गावागावात अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तींमुळे कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता अनेकांची संसार उद्धवस्त झाली आहेत.याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा, अवैध दारू पुरवठ्याचे जाळे उद्ध्वस्त करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून वस्तुस्थिती तपासावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नसून संबंधित विभागाकडून चौकशी झाल्यानंतरच नेमके वास्तव स्पष्ट होणार आहे. मात्र नागरिकांच्या तक्रारींमुळे हा विषय सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.







