
ब्राह्मण समाजाने समर्पणाच्या भावनेने एकत्र येऊन पतसंस्थेच्या उभारणीत योगदान द्यावे : धनंजय तांबेकर
नांदेड, दि. २७ : समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पतसंस्था हा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ असून, तिचे यश हे समाजातील परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि समर्पित कार्यपद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे वैयक्तिक मतभेद व अहंकार बाजूला ठेवून ब्राह्मण समाजाने एकसंघपणे पतसंस्थेच्या उभारणीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक धनंजय तांबेकर यांनी केले. श्री भगवान परशुराम पतसंस्थेच्या स्थापनेसंदर्भात आयोजित बैठकीत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुदखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रामराव चौधरी होते, तर प्रमोदराव देशमुख (सगरोळी) यांनी उद्घाटक म्हणून उपस्थिती लावली. प्रमुख वक्ते म्हणून साखर संचालक विश्वास देशमुख, तसेच विक्रम राजे, बालासाहेब पांडे, ॲड. महेश कनकदंडे, निखिल लातूरकर, ॲड. यदुपथ अर्धापूरकर, शांभवी साले यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन व भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व दासबोध ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात धनंजय तांबेकर म्हणाले की, सहकार क्षेत्रात पतसंस्था चालविणे ही अत्यंत जबाबदारीची बाब आहे. समाजाचा विश्वास संपादन करणे हेच सर्वात मोठे भांडवल असून, पतसंस्था कमी व्याजदरात व पारदर्शक पद्धतीने चालविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कर्जवाटप करताना गरजू आणि परतफेडीची क्षमता असलेल्या व्यक्तींनाच प्राधान्य दिल्यास संस्थेची आर्थिक शिस्त टिकून राहते. अन्यथा थकबाकी वाढून संस्थेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी समर्पणाच्या भावनेने कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात धनंजय देशमुख राहेरकर यांनी ब्राह्मण समाजाची स्वतःची पतसंस्था स्थापन करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून समाजातील विविध मान्यवरांशी संवाद साधल्याची माहिती दिली. आजच्या बैठकीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून समाजाच्या सहकार्याने हा उपक्रम निःस्वार्थ भावनेने यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ॲड. महेश कनकदंडे यांनी समाजातील मतभेद आणि हेवेदावे विसरून एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. समाजाच्या प्रगतीसाठी परस्पर सहकार्य, शिस्त आणि धर्माने सांगितलेल्या मूल्यांचे पालन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमोदराव देशमुख यांनी नव्या संस्थेचे नाव “श्री भगवान परशुराम पतसंस्था” असे सर्वानुमते घोषित केले. यावेळी संपादक तथा पत्रकार कृष्णा शेवडीकर, ॲड. आशिष गोधमगावकर आणि ॲड. मेगदे यांचा समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोपात रामराव चौधरी यांनी समाज एकत्र येऊन विधायक कार्य करत असल्याचा आनंद व्यक्त केला. समाजहिताच्या प्रत्येक उपक्रमासाठी आपले कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय ॲड. डॉ. प्रकाश जोशी यांनी करून दिला. सूत्रसंचालन रमाकांत जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभय कुळकजाईकर यांनी केले.
या उपक्रमासाठी मुख्य प्रवर्तक म्हणून धनंजय देशमुख राहेरकर, बंडोपंत कुंटूरकर, ॲड. डॉ. प्रकाश जोशी, प्रा. गोविंदराव चौधरी, रमाकांत जोशी, कृष्णा उमरीकर, सखाराम कुलकर्णी, श्रीनिवास देशमुख, ओंकार लव्हेकर, भीमराव श्रीमंत, अभय कुळकजाईकर, ॲड. छाया कुळकजाईकर, ॲड. कचरू जोशी, प्रसाद देशपांडे, रघुनाथ सरदेशपांडे, वेणूमाधव देशपांडे, राजश्री उमरीकर, सौ. सुचीता जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले. या बैठकीला ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. समाजाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी स्वतंत्र पतसंस्थेची उभारणी करण्याच्या दृष्टीने ही बैठक सकारात्मक आणि दिशादर्शक ठरल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.




